पुणे - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने चर्चा करत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. पण गप्पांच्या ओघात नरेंद्र मोदींचा विषय निघताच राहुल गांधी यांनी आपण मोदींप्रमाणे द्वेशाचे नाही तर प्रेमाचे राजकारण करतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच 'लव्ह यू मोदी' म्हणत आपण मोदींवरही प्रेम करतो असे सांगितले. मात्र राहुल गांधी यांनी 'लव्ह यू मोदी' असा उच्चार करताच संपूर्ण सभागृहात 'मोदी-मोदी' असा आवाज घुमला. त्यामुळे सभेनंतर या घटनेची चर्चा सुरू होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. शिक्षण, बेरोजगारी, ७२ हजाराचा 'न्याय', याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि मोदी सरकारच्या अपयशावरही बोट ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुक्त कार्यक्रमांमध्ये सहभागी का होत नाहीत? प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांना त्याची उत्तरं द्यावीच लागतील. पण आपल्यालाच सगळं माहीत आहे आणि इतरांना काहीच कळत नाही, हा मोदींचा अॅटिट्यूड आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच मोदींबद्दल आपल्या मनात अजिबात राग नाही, पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्काराची भावना आहे, असेही त्यांनी नमूद केले. ''नरेंद्र मोदी यांच्यावर माझं प्रेम आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. पण ते माझा तिरस्कार करतात. अर्थात, त्यालाही माझी हरकत नाही,'' असा टोला लगावत राहुल गांधी यांनी 'लव्ह यू मोदी' म्हटले. मात्र राहुल गांधी यांचे हे उच्चार ऐकताच संपूर्ण सभागृहामधून 'मोदी-मोदी' असा आवाज घुमू लागला.
राहुल गांधी म्हणाले, लव्ह यू मोदी... अन् सभागृहात एकच आवाज घुमला 'मोदी-मोदी'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 3:25 PM