काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी सांगितलं की, रायबरेलीमधून खासदार राहायचं की वायनाडमधून खासदार राहायचं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आहेत. निकालानंतर राहुल धर्मसंकटात अडकल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी यावेळी पुन्हा एकदा निशाणा साधला. "मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही तर माणूस आहे" असा खोचक टोला लगावला आहे.
"मी वायनाडचा खासदार म्हणून राहावं की रायबरेलीचा या संभ्रमात आहे. मला आशा आहे की, वायनाड आणि रायबरेली येथील लोक माझ्या निर्णयामुळे खूश होतील. प्रेमाने द्वेषाचा पराभव होतो आणि नम्रतेने अहंकाराचा पराभव होतो" असं राहुल गांधी यांनी लोकांचे आभार मानत म्हटलं आहे. या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवली होती.
राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश (UP) च्या रायबरेली लोकसभा जागेवर भाजपा उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांचा ३,९०,०३० मतांनी पराभव केला होता. तर वायनाडमध्ये राहुल गांधींनी माकपाच्या एनी राजा यांचा पराभव केला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली होती, पण अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना एक जागा निवडावी लागेल.
यावेळी नेहरू-गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजली जाणारी अमेठी पुन्हा एकदा काँग्रेसकडे आली आहे. लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची लढत ही उत्तर प्रदेशातील अमेठी जागेवर होती, जिथे यावेळी काँग्रेसचे नेते किशोरीलाल शर्मा यांनी निवडणूक लढवली. गेल्या वेळी या जागेवर राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांना भाजपाने पुन्हा एकदा तिकीट दिलं होतं. स्मृती इराणी यांना यावेळी काँग्रेसच्या किशोरीलाल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.