नवी दिल्ली: लडाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत आणि चीन संघर्षाचा (India China Faceoff) मुद्दा वर्षभरानंतरही विरोधी पक्षांनी लावून धरला आहे. भारत आणि चीन संघर्ष तसेच सीमावाद यांवरून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटले आहे.
चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात ज्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, ते चिनी नागरिक असल्याचा दावा करणारे वृत्त ग्लोबल टाईम्स या चिनी माध्यमाने दिले आहे. याचाच धागा पकडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.
चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल
गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच शोभून दिसतो. चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल. मोदीजी, मौन सोडा, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणांची नावे चिनी ठेवल्याचे वृत्त शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण १९७१ मधील गौरवपूर्ण विजयाची ५ दशके साजरी केली. देशाची सुरक्षा आणि विजयासाठी कठोर निर्णयांची गरज असते, खोट्या जुमल्यांनी विजय मिळत नसतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.
दरम्यान, लडाख येथे झालेल्या चीन आणि भारतातील संघर्षावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र सोडले. मनमोहन सिंह असते, तर केव्हाच राजीनामा दिला असता. मात्र, भाजपवाले सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दावा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला होता. काँग्रेसची लक्ष्मण रेषा सत्य आहे, तर भाजपची लक्ष्मण रेषा सत्ता आहे. हिंदुत्वाची विचारधारा मानणाऱ्या कुणाही समोर हे नतमस्तक होतात. यापूर्वी यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली आणि आता पैशांसमोर झुकले आहेत. यांच्या मनात सत्याची भावनाच नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.