शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना आम्ही तुरुंगात पाठवून दाखवू, सोडणार नाही, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या संसद परिसरात महात्मा गांधी पुतळा ते विजय चौकपर्यंत मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.
राहुल गांधी म्हणाले, “पुन्हा एकदा सगळेच्या सगळे विरोधक एकत्र येऊन लखीमपूर खिरीचे प्रकरण उपस्थित करीत आहेत. आम्ही हे वारंवार सांगितले की, एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना मारले. जीपखाली चिरडले. हा कट असल्याचा अहवाल आला आहे. ही काही क्वचित घडणारी घटना नाही. पंतप्रधान त्या मंत्र्याबाबत काही निर्णय घेत नाहीत.”
गांधी म्हणाले, “पंतप्रधान म्हणतात की, मी शेतकऱ्यांची माफी मागतो. दुसरीकडे आपल्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या मारेकऱ्याला ठेवतात. त्याला दूर करीत नाहीत, म्हणून सगळेच्या सगळे विरोधक एकत्र आले आहेत. सगळे विरोधी पक्ष अजय मिश्रा यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत.”
‘२०१४ पूर्वी लिंचिंग शब्द ऐकला नव्हता’
२०१४ पूर्वी म्हणजे मोदी सरकारच्या अगोदर लिंचिंग शब्द (जमावाकडून होणारी हत्या) ऐकण्यात येत नव्हता, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काही ठिकाणी जमावाकडून झालेल्या कथित हत्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. राहुल गांधी यांनी, ‘थँक्यू मोदीजी’ असा टोमणा मारला.