ओदिशा: भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेली टीका माझ्यासाठी गिफ्ट आहे. यापेक्षा दुसरं मोठं गिफ्ट माझ्यासाठी असू शकत नाही. जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर टीका करतात, तेव्हा तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली. 'भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं माझ्यावर अनेकदा टीका केली. एक राजकारणी म्हणून, एक माणूस म्हणून माझ्यासाठी ही टीका महत्त्वाची आहे. त्यांची टीका, शिव्याशाप यापेक्षा दुसरं चांगलं गिफ्ट माझ्यासाठी असू शकत नाही. मोदी जेव्हा जेव्हा माझ्यावर टीका करतात, तेव्हा तेव्हा त्यांना जाऊन मिठी मारावी, असा विचार माझ्या मनात येतो,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'ते (पंतप्रधान मोदी) माझ्याशी सहमत नाहीत याची मला कल्पना आहे. मीदेखील त्यांच्याशी सहमत नाही. मी त्यांच्याशी दोन हात करेन. ते पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी मी प्रयत्न करेन. पण मी कधीच त्यांचा तिरस्कार करणार नाही. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे,' असं राहुल गांधी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात आणि जनसभांवरही राहुल यांनी मिश्किल भाषेत टीका केली. 'आम्ही लोकांचं ऐकतो. मलाच सर्व माहीत आहे, असं मोदींना वाटतं. आम्हाला मात्र तसं वाटत नाही. मोदींच्या भाषणावरील आपलं मत लोकांना व्यक्तच करता येत नाही. हाच भाजपा आणि काँग्रेसमधला सर्वात मोठा फरक आहे,' असं राहुल म्हणाले. आपल्याला चीनला टक्कर द्यायची असल्यास रोजगाराच्या संधी वेगानं निर्माण कराव्या लागतील, असंही त्यांनी पुढे म्हटलं. स्वयंचलित यंत्रांचा परिणाम चीनमधील रोजगारांवर का होत नाही?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'जेव्हा मी कैलास मानसरोवर यात्रेला गेलो होतो, त्यावेळी मी तिथल्या काही मंत्र्यांशी चर्चा केली. रोजगार निर्मिती ही आमच्यासाठी समस्या नाही, असं ते म्हणाले. जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती करता, तेव्हा तुमच्या समोरील अडचणी कमी होतात,' असं राहुल गांधी म्हणाले.