नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीका केली जाऊ लागली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर भाजपाने देखील आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'बंद दाराआड तयार करण्यात आलेल्या भाजपाच्या संकल्पपत्रात दूरदृष्टीचा अभाव असून हे संकल्पपत्र अहंकाराने भरलेलं आहे,' अशी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी (9 एप्रिल) सकाळी ट्वीट करून भाजपावर निशाणा साधला आहे. 'काँग्रेसचा जाहीरनामा मोठ्या चर्चेनंतर तयार करण्यात आला आहे. 10 लाखांहून अधिक भारतीय नागरिकांच्या मतांचा यामध्ये समावेश केला आहे. हा अत्यंत प्रभावशाली दस्तऐवज आहे.’ असे ट्वीट त्यांनी केले आहे. तसेच भाजपाचा निवडणूक जाहीरनामा हा बंद दाराआड तयार करण्यात आला आहे. एकांगी विचाराने हा जाहीरनामा प्रेरित आहे. त्यात दूरदृष्टीचा अभाव असून अहंकाराने भरलेला हा जाहीरनामा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
जाहीरनामा : काँग्रेसच्या कव्हर पेजवर जनता तर भाजपाचं 'सिर्फ मोदी ही मोदी'
भाजपाच्या जाहीरनाम्यात सर्वकाही मोदी असचं सूचित करण्यात आले आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार, सामान्य नागरिक आणि गरिबांना केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे. तर भाजपाने मध्यमवर्गीय आणि राष्ट्रवाद यावर भर दिला आहे. अर्थात हे दावे या पक्षांनी केले आहे. परंतु, सध्या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्याचे कव्हरपेज चर्चेचा विषय ठरले आहे.
गेल्या आठवड्यात काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची फळी व्यासपीठावर होती. या जाहीरनाम्याच्या कव्हर पेजवर भारतीय जनता दिसत आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो छोटा लावण्यात आला आहे. कव्हर पेजवरून देखील काँग्रेसने भारतीय जनताच आपला केंद्रबिंदू असल्याचा संदेश दिला आहे. तर कव्हर पेजवर राहुल गांधी यांचा फोटो छोटा घेतल्यामुळे युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराजी दर्शविल्याचे वृत्त होते. मात्र राहुल यांनी स्वत:पेक्षा जनतेला प्राधान्य दिले, निश्चितच आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याच्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो घेण्यात आला आहे. तसेच भाजपाचे अध्यक्ष किंवा एकाही ज्येष्ठ नेत्याचा फोटो या जाहीरनाम्यावर दिसत नाही. तर जनता देखील कुठेही नाही, यामुळे भाजपाच्या जाहिरनामा म्हणजे, 'सिर्फ मोदी ही मोदी', अशी चर्चा रंगत आहे.