नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या ओबीसी संमेलनात 2019च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं. यावेळी राहुल गांधी यांनी ओबीसी वर्गाच्या विकासासाठी कोका-कोला कंपनीचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले, कोका कोला कंपनी सुरू करणारा व्यक्ती आधी अमेरिकेत लिंबू सरबत विकायचा. तो पाण्यात साखर मिसळत होता. त्यामुळेच त्याचा अमेरिकेत योग्य सन्मान झाला. त्याला पैसे मिळाले आणि तो आता कोका-कोला कंपनीचा मालक बनला.कोका कोला कंपनीसारखाच मॅकडोनाल्ड कंपनीचा मालकही ढाबा चालवत होता. आता जगभरात त्यांचं नाव आहे. भारतात आज एकही असा ढाबेवाला नाही, जो कोका-कोलासारख्या मोठ्या कंपनीचा मालक आहे. संमेलनादरम्यान राहुल गांधींनी संघ आणि भाजपावरही निशाणा साधला आहे. भाजपा आणि संघाकडून देशात फूट पाडण्याचं काम केलं जात आहे, असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला. मोदी सरकारकडून ओबीसी समुदायाची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.'काँग्रेसमध्ये इतर मागासवर्गीय जातींना योग्य तो सन्मान दिला जातो. मात्र भाजपामधील स्थिती तशी नाही. सध्या देशात जी व्यक्ती काम करते, तीच मागे राहते अशी स्थिती आहे. एखादी व्यक्ती काम करते, मात्र श्रेय दुसरीच व्यक्ती लाटते, असं चित्र सध्या देशात आहे. ज्याच्याकडे कौशल्य आहे, जो कष्ट करत आहे, त्याला योग्य तो सन्मान दिला जात नाही,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणे, कोका-कोला कंपनीचे मालक एकेकाळी अमेरिकेत लिंबू सरबत विकायचे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 5:00 PM