नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा देण्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ठाम आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांनी एका बैठकीत आपले मत मांडले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले की, मी काँग्रेसच्या पराभवाची जबाबादारी घेत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर देखील अनेक वरिष्ठ नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना परभवाची जबाबदारी घ्यावीशी वाटली नाही, याची खंत आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या घरी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच राजीनामा देण्यावर आपण ठाम असल्याचे म्हटले. मात्र पक्ष प्रमुख नसताना देखील आपण पक्षात सक्रिय भूमिका निभावणार असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
एका सुत्राने दिलेल्या महितीनुसार, पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर देखील काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना, महासचिवांना आणि प्रभारींना पराभवाच्या जबाबदारीची जाणीव झाली नाही, याची खंत राहुल गांधी यांना आहे.
दरम्यान राहुल यांची नाराजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविषयी सर्वाधिक आहे. याआधी २५ मे रोजी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी या दोन मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. तर कमलनाथ यांनी आपल्या मुलासाठी सर्वाधिक सभा घेतल्याचे वृत्त देखील आले होते.