आदेश रावल -
श्रीपेरुम्बुदुर / चेन्नई/ नवी दिल्ली : द्वेष आणि विभाजनामुळे मी माझ्या वडिलांना गमावले आहे; मात्र देश गमावू इच्छित नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी बुधवारी दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली अर्पण केली आणि एका प्रार्थना सभेत सहभागी झाले.
तमिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदुरमध्ये तीन दशकांपूर्वी एका रॅलीत घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता. राहुल गांधी यांनी स्मारकस्थळी एक रोपही लावले. यावेळी काँग्रेसचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. एस. अलागिरी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, मी माझ्या प्रिय देशाला गमावणार नाही. प्रेम द्वेषावर विजय मिळवेल. आशा भीतीवर मात करेल. श्रीपेरुम्बुदुर येथील राजीव गांधी स्मारकाला दिलेल्या भेटीचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
३५०० किमीची भारत जोडो यात्रा १२ राज्यांतून जाणार आहे. ही यात्रा ११ सप्टेंबर रोजी केरळात येईल, तर पुढील १८ दिवसांत विविध राज्यांतून ३० सप्टेंबर रोजी कर्नाटकात दाखल होईल. त्यानंतर ही यात्रा उत्तरेकडे जाईल. यासाठी प्रत्येक राज्यात मोठी तयारी करण्यात आली आहे.
१५० दिवस कंटेनरमध्येच राहणार राहुल गांधीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची १५० दिवस चालणारी भारत जोडो यात्रा बुधवारी कन्याकुमारीहून सुरू झाली असून, यात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ११७ नेते व कार्यकर्ते ३५७० किलोमीटर पायी चालणार आहेत. या सर्वांची राहण्याची, तसेच जेवणाची व्यवस्था हॉटेल किंवा नेत्याच्या घरी केलेली नाही, तर पक्षाने ५० कंटेनर तयार केले असून, त्यात राहुल गांधी यांच्यासह सर्व नेते रात्री थांबणार आहेत.
ऐतिहासिक क्षण : सोनिया गांधी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ हा भारतीय राजकारणासाठी परिवर्तनकारी क्षण आहे. त्यातून पक्षाला संजीवनी मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.
देश मोठ्या संकटात : राहुल राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या संघटना भारताच्या संस्थांवर आक्रमण करत आहेत. देश मोठ्या आर्थिक संकटाने घेरला गेला आहे. भारताला एकजूट करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यांना असे वाटते की, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबता येईल. पण, विरोधी पक्षाचे नेते भित्रे नाहीत.