देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देश केवळ हेलिकॉप्टर, जहाज, तोफांनी मजबूत होत नाही. तर देशातील नागरिक मजबूत झाला तरच देश मजबूत होतो हे मोदी सरकारनं समजून घ्यायला हवं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. ते उत्तराखंडमध्ये बोलत होते. उत्तराखंडच्या देहरादून येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
"तुम्ही असा अजिबात विचार करु नका की हिंदुस्थान मजबूत होत आहे. या गैरसमजुतीमध्ये अजिबात राहू नका. हेलिकॉप्टर, जहाज, तोफांनी देश मजबूत होत नाही. देश तेव्हाच मजबूत होतो जेव्हा देशातील नागरिक मजबूत होतो. जेव्हा देशातील जनता कुणालाही न घाबरता, कोणत्याही भीतीविना काम करू शकते. जेव्हा देशाचा आवाज कानाकोपऱ्यात सहज पोहचू शकतो, तेव्हाच देश मजबूत होतो", असं राहुल गांधी म्हणाले.
"बांगलादेश युद्धावेळी देश मजबूत होता. आपल्या संस्था मजबूत होत्या. सैन्य आणि सरकारमध्ये जबरदस्त समन्वय होता. सरकार सैन्याचं ऐकायचं आणि सैन्य देखील सरकारचं ऐकायचं. दोघंही एकमेकांचा आदर करत होते. संवाद होता. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. त्यामुळेच पाकिस्तानला १३ दिवसांत पराभूत करू शकलो. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही", असंही राहुल गांधी म्हणाले.