नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या कर्फ्यूसाठी मदत करणाऱ्या नागरिकांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. मात्र, त्या आवाहनावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे, की कोरोना व्हायरसमुळे छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजूरांना मोठा फटका बसला आहे. टाळ्या वाजवून त्यांना मदत मिळणार नाही. त्यांना आर्थीक मदतीची आवश्यकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, रेल्वे प्रशासनानेही रविवारी महत्वाच्या गाड्या रद्द केल्या आहेत. कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी रेल्वेने रविवारी देशभरातील जवळपास 3,700 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. या पाठोपाठच देशातील इंडिगो आणि गोएअर या मोठ्या कंपन्यांनीही जवळपास 1 हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मुंबई मेट्रोनेही रविवारी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षाही इटलीमध्ये मृतांची संख्या वाढली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाने ११ हजारांवर बळी घेतले आहेत. तर भारतात अद्याप चार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता असून आज कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याने देशासमोर धोक्याची घंटा वाजत आहे.
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६५ वर गेलेली आहे. तर एकाचा मृत्यू झालेला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आज ४० ने वाढली असून आता हा आकडा २९८ वर पोहोचला आहे. यामध्ये ३९ जण परदेशी नागरिक आहेत.