"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 09:45 AM2024-06-18T09:45:24+5:302024-06-18T09:47:11+5:30
Rahul Gandhi BJP Ayodhya: यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा असल्याचेही व्यक्त केले मत
Rahul Gandhi, BJP Ayodhya: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड अशा दोनही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निकाल लागल्यानंतर, राहुल गांधी कोणता मतदारसंघ सोडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राहुल यांना वायनाडचा मतदारसंघ सोडला आणि रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सांगितले. राहुल गांधींचा हा निर्णय झाल्यावर त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी भाजपाला अयोध्येतील पराभवावरून सणसणीत टोला लगावला.
"उत्तर प्रदेशात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारा आहे. द्वेषाच्या राजकारणाला सणसणीत उत्तर यूपीच्या जनतेने दिले. अयोध्येत भाजपाचा पराभव हा जनतेने त्यांना दिलेला स्पष्ट संदेश आहे की, भाजपाने जे द्वेषाचे राजकारण चहुबाजूंना पसरवले होते, त्याचा लोकांनी स्वीकार केलेला नाही," अशा शब्दांत राहुल यांनी भाजपावर खरमरीत टीका केली.
"उत्तर प्रदेशात आता निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात आगामी लढती रंगणार आहेत. मला अपेक्षा आहे की यूपी मध्ये काँग्रेस आगामी निवडणुकामध्ये दमदार यश मिळवेल. मी वायनाडमधून राजीनामा दिला की येथून प्रियंका गांधी निवडणूक लढतील. त्यांना माझा पाठिंबा आहे. वायनाडच्या जनतेला आम्ही जी वचनं दिली, ती वचने आम्ही नक्कीच पूर्ण करू," असेही राहुल गांधी म्हणाले.