नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी (24 ऑगस्ट) दुपारी श्रीनगर विमानतळावर पोहोचले. राहुल यांच्यासोबत विरोधी पक्षातील 8 घटक पक्षांचे एकूण 11 नेते सोबत होते. जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते. जम्मू काश्मीरमध्ये जाऊन येथील परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक नेत्यांसह, सामान्य नागरिकांची राहुल गांधी भेट होते. मात्र, राहुल यांना श्रीनगर विमानतळावरुन आतमध्ये सोडण्यात आले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना श्रीनगर विमातळावरच अडकून पडावे लागले होते.
जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार, राहुल गांधी 11 नेत्यांसह श्रीनगरला पोहोचले. मात्र, राहुल हे श्रीनगर येथे पोहोचताच, काही गोंधळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे श्रीनगर येथून पुढे येण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला. विशेष म्हणजे, श्रीनगर विमानतळावरुन त्यांना दिल्लीला परत फिरावे लागले. याबाबत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी एका चांगल्या हेतुने राहुल गांधींना निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांच्याकडून या बाबीचं राजकारण करण्यात येत आहे.
कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीकेचं लक्ष्य केलेलं असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असं आवाहन केलं होतं. त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिलं होतं. यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी ट्विट करत मी विना अट काश्मीरातील लोकांना भेटण्यासाठी तयार आहे. मी कधी आणि केव्हा यायचं? असं त्यांनी म्हटलं होतं.
काश्मीरमधील बहुतांश भागात या आठवड्यात संचारबंदीसह लागू केलेले काही निर्बंध मागे घेण्यात आले होते. जागोजागी लावलेले बॅरिकेटस् काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे रसत्यावर लोकांची वर्दळ व वाहनांची ये-जा सुरू झाली होती. मात्र, राज्यातील सर्व बाजारपेठा अद्यापही बंद आहेत. 370 कलम रद्द केल्यापासून अठराव्या दिवशीही गुरुवारी इंटरनेट व मोबाईल सेवाही बंद ठेवण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढावा, असे आवाहन करणारी फुटीरतवाद्यांच्या संयुक्त विरोधी समितीची भित्तीपत्रके झळकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. लोकांनी लाल चौक व सोनवार येथे मोठ्या प्रमाणावर जमा होऊ नये म्हणून रस्त्यांत बॅरिकेटस् व तारांच्या जाळ्यांचे अडथळे उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.