मानहानी प्रकरणी राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा, १५ हजारांचा दंड, उच्च न्यायालयात जाण्यासाठी शिक्षा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 07:07 AM2023-03-24T07:07:11+5:302023-03-24T07:09:00+5:30
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीनवेळा न्यायालयात हजर झाले.
सुरत : ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते...’ या २०१९ मध्ये केलेल्या विधानाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधींना दोषी ठरवले. या निर्णयाच्या २७ मिनिटांनंतर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंडही ठोठावला. काही काळानंतर त्याच न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला. तसेच, शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली. सुनावणीदरम्यान राहुल गांधी न्यायालयात हजर होते.
न्यायाधीशांनी राहुल गांधी यांना दोषी ठरवले आणि विचारले की, काही बोलायचे आहे का? त्यावर राहुल गांधी यांचे वकील बाबू मांगुकिया म्हणाले की, राहुल गांधी भ्रष्टाचाराविरोधात बोलले; पण जाणूनबुजून काहीही बोलले नाही. त्यांच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान झालेले नाही, त्यामुळे किमान शिक्षा व्हावी. दुसरीकडे फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, राहुल गांधी हे खासदार आहेत, जे कायदा करतात. त्यांनीच तो मोडला तर समाजात काय संदेश जाईल, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. राहुल गांधी यांचे वकील न्यायालयात म्हणाले, आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राहुल गांधींकडे ३० दिवसांचा अवधी आहे. (वृत्तसंस्था)
काय आहे प्रकरण?
२०१९च्या निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ मग तो ललित मोदी असो की नीरव मोदी असो की नरेंद्र मोदी’, असे म्हटले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान
राहुल गांधी तीनवेळा न्यायालयात हजर झाले.
निर्णयाला आव्हान दिल्यास खासदारकी राहणार
जुलै २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ज्या लोकप्रतिनिधींना (आमदार-खासदार) न्यायालयात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली आहे, त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्यांना सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश लागू होणार नाही, असे स्पष्ट केले होते.
दयायाचना नाही
राहुल यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, यामुळे कोणाचेही नुकसान झालेले नाही. म्हणूनच आम्ही दया मागत नाही.
सत्य हाच माझा देव आहे...
शिक्षा जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचे वचन ट्वीट केले. ‘माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे, अहिंसा ते मिळवण्याचे साधन - महात्मा गांधी’, असे ट्वीट त्यांनी केले.