नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्याकडे या कृती दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. देशासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचं काम हुडा यांच्याकडे असेल. ते सुरक्षेशी संबंधित जाणकारांची मतं विचारात घेऊन एक आराखडा तयार करतील. सर्जिकल स्ट्राइक दरम्यान हुडा नॉर्दन आर्मीचे कमांडर होते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केल्याची माहिती काँग्रेस पक्षानं ट्विटरवर दिली. 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना करण्यासाठी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांची भेट घेतली. हुडा देशासाठी एक कृती आराखडा तयार करतील,' असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसनं सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन केली आहे. काँग्रेसचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
सर्जिकल स्ट्राइकच्या हिरोचा राहुल गांधींना 'हात'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी कृती दल स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 8:07 PM