राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबईत समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी 'शक्ती'चा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला होता. "हिंदू धर्मात एक शक्ती आहे. आमची लढाई मोदी अथवा भाजप यांच्या विरोधात नाही. तर एका शक्ती विरोधात आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या याच हल्ल्याला शस्त्र बनवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील जगतयालमध्ये एका निवडणूकसभेला संबोधित करत विरोधी पक्षावर जबरदस्त हल्ला चढवला आहे.
'परिवार' नंतर आता 'शक्ती' वरून विरोधकांनी केलेल्या हल्ल्यालाही शस्त्र बनवत मोदी म्हणाले, "इंडी अलायन्सने काल आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. शिवाजी पार्कमध्ये इंडी आघाडीने 'शक्ती'ला संपवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या आव्हानाचा मी स्वीकार करतो." महिलांना शक्ती स्वरूपा संबोधत मोदी म्हणाले, एका बाजूला शक्तीला संपवण्याची वल्गना करणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला शक्तीचे उपासक आहेत.
महिलांना शक्ती स्वरुपा संबोधत मोदी म्हणाले, शक्तीचा उपासक आणि भारत मातेचा पुजारी आहे. एवढेच नाही, तर आपण शक्तीला संपवणाऱ्यांना संधी द्याल का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. तसेच, विरोधीपक्ष शक्तीला संपवण्याच्या वल्गना करत आहे. पण, कोण शक्तीचा आशीवार्द मिळवतं आणि कोण शक्तीला संपवतं, चार जूनला स्पष्ट होईल.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, माझ्यासाठी प्रत्येक माता शक्तीचे रूप आहे, प्रत्येक मुलगी शक्तीचे रूप आहे. मी यांची शक्तीच्या स्वरुपात पूजा करतो आणि मी या शक्ती स्वरूपा माता-बहिणींच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावेल. एवढेच नाही तर, सांगा आपण शक्तीला संपवण्याऱ्यांना संधी द्याल का? असा प्रश्नही मोदी यांनी यावेळी विचारला.