मुंबई - देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अद्यपही कायमस्वरुपी अध्यक्ष मिळालेला नाही. तसेच, काँग्रेसकडून 2024 च्या निवडणुकांसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून कुठलाही चेहरा दिला नाही. त्यामुळे, काँग्रेसच्या राजकीय रणनितीबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यातूनच, प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनाही पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जाते. यावरुनच, आता बॉलिवूड अभिनेता केआरकेनं शिवसेनेच्या मताशी सहमती दर्शवली आहे.
आगामी काळात पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. त्यातच, सन २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील चेहरा कोण असेल यावर विरोधी पक्षांचं अद्याप एकमत होताना दिसत नाही. पण शिवसेनेनं राहुल गांधी यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दावेदारी नाकारताना शिवसेनेनं तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांना खेळ बिघडवणारे पक्ष म्हणून टीका केली आहे.
राहुल गांधी हेच भाजपला रोखणारे नेते
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधील 'रोखठोक' या सदरातून खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये राऊत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची तुलना पुन्हा एकदा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. लखीमपूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला तसेच त्यांच्या कार्यपद्धतीत इंदिरा गांधी यांची झलक दिसते असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे एकमेव असे नेते आहेत जे दिल्लीतील भाजप सरकारला मजबूत पर्याय ठरु शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे.