काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असून ते देशाचा अपमान करत आहेत. लंडनमध्ये देशाची बदनामी केल्यामुळे राहुल गांधी जाहीर माफी मागत नाहीत तोवर भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा केंद्रीय माहिती व प्रसारण आणि युवा व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी दिला.
मंगळवारी येथे आयोजित ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये वरिष्ठ पत्रकार मारिया शकील यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, आम आदमी पक्ष तसेच राहुल गांधींवर सडकून टीका केली. भारताची अर्थव्यवस्था वेगात पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगामध्ये विश्वासार्हता वाढली आहे. नवा भारत सशक्त बनला आहे. परंतु, दुसरीकडे राहुल गांधी व त्यांचे सहकारी देशाच्या सैनिकांचे मनोबल कमी करीत आहेत. देशाला अपमानित करीत आहेत. अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, असा आरोप करीत आहेत. परंतु, ते विसरतात की, यूपीए सरकारच्या काळात सर्वाधिक हिंसाचार होत होता. काश्मीरमध्ये दगडफेक होत होती. राष्ट्रध्वज जाळला जात होता. आज तसे काहीच होत नाही.
आणीबाणीचा सर्वांत मोठा दुरुपयोग इंदिरा गांधी यांनीच केला होता. देशातील अल्पसंख्याक भाजपसाेबत आहेत. हे 'सबका साथ, सबका विकास' तत्त्वावर चालणारे सरकार आहे. सरकारची धोरणे सर्वांसाठी समान आहेत. आम्ही कोणाचेही लांगूलचालन करीत नाही. काँग्रेसकरिता गांधी परिवाराशिवाय काहीच महत्त्वाचे नाही. त्यांच्यासाठी देशही कवडीमोल आहे. इंदिरा इज इंडिया, ही घोषणा काँग्रेसनेच दिली होती. गांधी कुटुंबीयांनी मनमोहन सिंग यांचाही सतत अपमान केला, असा आरोप अनुरागसिंह ठाकूर यांनी केला. काँग्रेस व आप हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचाराची खाण आहेत. ते पैशांसाठी देशही विकून खातील. सत्येंद्र जैन व मनीष सिसोदिया अपराधी नाहीत तर मग त्यांना जामीन का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला. जमीन घोटाळ्यात राहुल गांधीही जामिनावर आहेत. प्रियंका गांधी यांनीदेखील भ्रष्टाचार केला आहे. लालू यादव यांनी तर जनावरांचा चारा सोडला नाही. त्यांनी नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा भ्रष्ट उपक्रमही राबविला. यूपीए सरकारने देशाची अर्थव्यवस्था लंगडी केली होती. भाजप सरकारने ती अर्थव्यवस्था उभी केली. यावेळी ठाकूर यांनी पद्म पुरस्कारांबाबत मोठा आरोप केला. पद्म पुरस्कारांबाबत काँग्रेस व ‘आप’चे विचार सारखे आहेत. काँग्रेसच्या काळात पेंटिंग व पैशांच्या बदल्यात पद्म पुरस्कार देण्यात यायचे, तर ‘आप’ भ्रष्टाचाऱ्यांना पुरस्कार देण्याची मागणी करत आहे, असे ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"