'राहुल गांधींनी कर्नाटकमधून निवडणूक लढवावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:28 PM2019-03-16T18:28:03+5:302019-03-16T18:28:27+5:30

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी ट्विट करून राहुल गांधी यांनी कर्नाटकमधून निवडणूक लढविण्याची अपील केली आहे. 

'Rahul Gandhi should contest from Karnataka' | 'राहुल गांधींनी कर्नाटकमधून निवडणूक लढवावी'

'राहुल गांधींनी कर्नाटकमधून निवडणूक लढवावी'

Next

बंगळुरू : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. देशातील बडे नेते लढवत असलेल्या मतदार संघासंदर्भात सध्या जोरात चर्चा सुरू आहेत. त्यातच आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूककर्नाटकमधून लढवावी अशी, विनंती कर्नाटक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी ट्विट करून राहुल गांधी यांनी कर्नाटकमधून निवडणूक लढविण्याची अपील केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, राहुल गांधी यांनी दक्षिण भारतातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रतिनिधित्व करावे. तसेच कर्नाटकमधूनच निवडणूक लढवावी. याआधी राहुल गांधी महाराष्ट्रातून निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु त्याबाबत अद्याप काहीही निर्णय झाला नाही. आता कर्नाटकमधून राहुल यांनी निवडणूक लढविण्याची अपील काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

राहुल गांधी यांनी आतापर्यंत अमेठीतून निवडणूक लढविली आहे. तसेच राहुल लोकसभेत अमेठीचे प्रतिनिधित्व करत आहेत. राहुल गांधी यांनी दोन जागांवरून निवडणूक लढविण्याची मागणी अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत राहुल गांधी यांचे नाव होते, त्यामध्ये राहुल यांची अमेठी मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, या मागणीला राहुल यांच्याकडून अद्याप दुजोरा मिळाला नाही.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. ११ एप्रिल रोजी पहिल्या फेरीचे मतदान होणार आहे. तर १९ मे रोजी सातव्या टप्प्याचे मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये लोकसभा निवडणुकीसह विधानसभेसाठीही मतदान होणार आहे.

Web Title: 'Rahul Gandhi should contest from Karnataka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.