ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर दिग्विजय सिंह यांनी केलेली टीका ताजी असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्रिपद स्वीकारायला पाहिजे होते असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. काँग्रेसमधील नेतेच यात आघाडीवर होते. या रांगेत आता पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना चव्हाण म्हणाले, यूपीए सरकारची पहिली टर्म (२००४ -२००९ ) चांगली होती. पण २००९ च्या निवडणुकीनंतर यूपीएची प्रतिमा डागाळली गेली. राहुल गांधी यांनीदेखील मंत्रिपद स्वीकारले नाही व यामुळे आम्हाला शेवटी पराभवाचा सामना करावा लागला.
काँग्रेसच्या अल्पसंख्यांक धोरणावरही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. 'मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचा विषय अनेकवर्ष प्रलंबित असल्याने त्याला मंजूरी दिली. पण लोकसभा निवडणुकीत मुस्लिमबहूल भागांमध्ये मुस्लिम नेत्यांनाच प्रचारासाठी पाठवणे हे धोरण चुकीचे ठरले. मुस्लिमबहुल भागामध्ये फक्त मुस्लिमच मतदार आहे असा संदेश गेल्याचे परखड मत त्यांनी मांडले.