नवी दिल्ली - काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरून चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. राजीनाम्यावर ठाम असलेल्या राहुल यांची समजूत काढण्याच्या प्रयत्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्याकडून सुरु आहे. या विषयावर बोलताना, राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले आहे. चेन्नईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले.
येत्या गुरुवारी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मोदींच्या शपथविधला तामिळ सुपरस्टार रजनीकांत हे सुद्धा उपस्थित रहाणार आहे. चेन्नईत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या राजीनाम्यावर सुद्धा आपले मत व्यक्त केले. राहुल हे पक्षातील नेत्यांमध्ये खूप तरूण आहे, मात्र कॉंग्रेसमध्ये असलेले जेष्ठ नेत्यांनी निवडणुकीत परिश्रम घेतले नसल्याचे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये. आपण दाखवून देऊ शकतो हे राहुल गांधी यांनी सिद्ध करून दाखवावे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीत विशेष मेहनत घेतली नसल्याचेही रजनीकांत म्हणाले. राहुल यांच्यासाठी काँग्रेस पक्षाला हाताळणे कठीण आहे असे आपल्याला वाटते, असे रजनीकांत म्हणाले.
भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. भारतात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी करिश्मा असलेले नेते होते. त्यांच्या नंतर आताच्या काळात नरेंद्र मोदी हे करिश्मा असलेले नेते आहेत. असे रजनीकांत म्हणाले. यावेळी रजनीकांत यांनी एनडीएची प्रशंसा सुद्धा केली. ते म्हणाले, नितीन गडकरी यांनी गोदावरी प्रकल्पासाठी चांगले काम केले आहे. त्यांनी तमिलनाडुला सुद्धा गंभीरपणे घेतले पाहिजे, असे रजनीकांत म्हणाले.