ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मौन सोडून त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी आणि जनतेसमोर यायला हवे असे परखड मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मांडले आहे. लोकसभा निवडणुकीत ६३ वर्षीय वृद्ध व्यक्ती तरुणांना आकर्षित करु शकली आणि ४४ वर्षीय व्यक्ती यात अपयशी ठरली ही दुर्दैवी बाब आहे असे सांगत दिग्गीराजांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिग्विजय सिंह यांनी मुलाखात दिली असून यात त्यांनी राहुल गांधी यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. 'सध्या प्रसारमाध्यमं आणि ब्रेकींग न्यूझचे जग आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे सुनियोजीत पद्धतीने प्रसारमाध्यमांमध्ये झळकत राहिले. काँग्रेसच्या पुनरागमनासाठी पद्धतीने राहुल गांधी यांनीदेखील त्यांचे मौन सौडून जनतेसमोर यायला हवे असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
जनतेला राहुल गांधी ब्रँड काय आहे, त्यांची भूमिका काय हे जाणून घ्यायये असल्याने राहुल गांधींसाठी हे सर्व गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना सहकार्य केले नव्हते हे वृत्तही दिग्गीराजांनी फेटाळून लावले.