नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या राहुल गांधी यांनी या कायद्यातील तरतुदींवर फक्त 10 ओळी बोलून दाखवावे, असे आव्हान जे. पी. नड्डा यांनी केले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाने आभार प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी राहुल गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यातील तरतुदींवर फक्त 10 ओळी बोलून दाखवावे. त्यांनी दोन ओळीत सांगावे की, या कायद्यामुळे देशाचे काय नुकसान होणार आहे, असे जे. पी. नड्डा म्हणाले.
याशिवाय, या देशाचे दुर्दैव आहे की, जे भारताचे नेतृत्व करण्यास येतात त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत मूलभूत माहिती सुद्धा माहीत नाही, असे म्हणत जेपी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण, या नुकसानीबद्दल राहुल गांधींनी काहीच निषेध केला नाही, असेही जेपी नड्डा यांनी सांगितले.
दरम्यान, दुसरीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देशामध्ये फूट पाडून द्वेष लपवत असल्याचा आरोप केला आहे. एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह देशात असलेल्या बेरोजगारी व अर्थव्यवस्थेचे नुकासान केल्यामुळे जनतेच्या मनात असणाऱ्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही. यामुळे ते भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत.