ठाणे : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या गंभीर आरोपांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेसंदर्भात ठाणे न्यायालयाने मंगळवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांना हजर राहण्याची नोटीस बजावली होती.
त्यानुसार मंगळवारी ठाणे न्यायालयात येचुरी यांचे वकील हजर राहिले. तर राहुल गांधी यांना हजर राहण्याबाबत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी पुरावे सादर न केल्याने गांधी यांच्यावतीने कोणीही हजर राहू शकले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही नेत्यांना ठाणे न्यायालयाने येत्या १ जुलैची तारीख दिली आहे.
गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हत्या केली गेली. या हत्येच्या दुसºया दिवशी ६ सप्टेंबर रोजी राहुल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कुणी बोलले तर असेच मारले जाते, असे वक्तव्य केले होते. याचदरम्यान येचुरी यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले होते. याविरोधात ठाण्यातील याचिकाकर्ते विवेक चंपानेरकर यांनी गांधी आणि येचुरी यांच्यावर एक रुपयाचा मानहाणीचा दावा दाखल करून दोघांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरूद्ध बोलण्यास मनाई करावी, अशी मागणी केली होती.हा दावा पटलावर आल्यावर ठाणे दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश जे.एस.भाटिया यांनी गांधी आणि येचुरी यांना ३० एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार येचुरी यांचे वकील किशोर सामंत यांनी हजर राहून त्यांनी येचुरी हे निवडणूक कामात व्यस्त असून त्यांना वकील नियुक्तीसाठी वेळ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. तर राहुल गांधी यांच्यावतीने कोणीही हजर राहिले नाही. त्यानंतर या दोन्ही नेत्यांना येत्या १ जुलैची तारीख दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
याचिकाकर्त्याचे वकील आदित्य मिश्रा यांनी त्या दोन्ही नेत्यांना हजर होण्यासाठी १ जुलैची तारीख दिली. तसेच दोघांनाही पोस्टाने पाठवलेली नोटीस मिळाल्याचे पुरावे मंगळवारी न्यायालयात सादर केले. त्यानुसार तो मुद्दा आता पटलावर घेतल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.