Rahul Gandhi London Visit : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी लंडनमध्ये प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. बीबीसी डॉक्युमेंटरी वादावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, 'बीबीसीवरील कारवाईची घटना म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. हे एक प्रकारे अदानीसारखेच आहे. हा एक प्रकारे वसाहतवादी हँगओव्हर आहे,' अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली.
बीबीसीने सरकारविरोधात बोलणे बंद करावे...ते पुढे म्हणाले, 'बीबीसीला आताच समजलंय, पण भारतात गेल्या 9 वर्षांपासून हा प्रक्रार सुरू आहे. पत्रकारांना धमक्या दिल्या जातात, हल्ले केले जातात आणि सरकारच्या बाजुने बोलणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात. हा एक पॅटर्न आहे, मला वेगळी अपेक्षा नाही. जर बीबीसीने सरकारच्या विरोधात लिहिणे बंद केले तर सर्व काही पूर्वीसारखे होईल. ही भारताची नवीन विचारसरणी आहे. भारताने शांत राहावे अशी भाजपची इच्छा आहे,' असा खोचक टीकाही राहुल यांनी लगावला.
माध्यमांना गप्प करणे हा नवा ट्रेंड आहेजेव्हा राहुल गांधींना विचारण्यात आले की, मीडियाला गप्प बसवणे हा नवीन ट्रेंड आहे का? यावर ते म्हणाले, 'आज ज्या प्रमाणात हे केले जात आहे, त्या प्रमाणात हे पूर्वी कधीच केले गेले नव्हते. हा भारतीय संस्थांवरील हल्ला आहे, जो आधुनिक भारतात यापूर्वी कधीही दिसला नव्हता. त्यामुळेच भाजपच्या देशाला गप्प करण्याच्या प्रयत्नांविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही 'भारत जोडो यात्रा' काढली,' असेही ते म्हणाले.
लोकशाही संरचनेवर क्रूर हल्ले'भारताच्या लोकशाहीवर हल्ले होत आहेत आणि देशासाठी पर्यायी दृष्टीकोनातून एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. माध्यमे, संस्थात्मक संरचना, न्यायव्यवस्था, संसद या सर्वांवर हल्ले होत आहेत आणि आम्हाला लोकांचे प्रश्न सामान्य पद्धतीने मांडणे फार कठीण जात आहेत. भाजपला भारताने गप्प राहावे असे वाटते. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि भारताची संपत्ती आपल्या मित्रांना द्यायची,' अशी टीका राहुल यांनी केली होती.