ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी अखेर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ईडी, सीबीआय आणि आयटी आता भाजपाचे साथीदार झाले आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ईडी, सीबीआय, आयटी इत्यादी आता सरकारी संस्था नाहीत. आता ते भाजपाचा विरोधी पक्षाला मिटवण्याचा सेल बनले आहे. स्वतः भ्रष्टाचारात बुडालेला भाजपा सत्तेसाठी लोकशाही उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवत आहे" असं म्हणत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं.
प्रियंका गांधी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "विरोधमुक्त संसद, लोकशाहीमुक्त भारत, प्रश्नमुक्त मीडिया आणि सुसंवादमुक्त जनता - हे भाजपा सरकारचं ध्येय आहे. सर्व राज्यांमध्ये एक एक करून सरकार पाडलं जात आहे. विरोधी पक्षनेत्यांना त्रास दिला जात आहे. जो भाजपामध्ये सामील होणार नाही तो तुरुंगात जाईल."
"झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मागे ईडी लावून त्रास देणं आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणं हे याच दुर्भावनापूर्ण मोहिमेचा भाग आहे. 140 कोटी जनतेचा आवाज दाबून टाकू शकतो हा भाजपाचा भ्रम आहे. जनता प्रत्येक अत्याचाराला उत्तर देईल" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी खोचक टीका केली आहे.