Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे कारण नागरिकांच्या नोकऱ्या हिसकावून घेण्याच्या कामात मोदी सरकार व्यग्र आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. यासाठी राहुल गांधी यांनी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीनं (सीएसआयई) प्रकाशित केलेल्या अहवालाचा संदर्भ दिला आहे. (Rahul gandhi slams modi governmnet over unemployment said centre is harmful for employment)
राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून यात मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे. कोणत्याही प्रकारच्या 'मित्रहीन' व्यवसायांना किंवा रोजगारा प्रोत्साहन किंवा मदत मोदी सरकार करत नाही. ज्यांच्याकडे नोकरी आहे तीही हिसकावून घेण्याचं काम केलं जात आहे. देशवासियांकडून आत्मनिर्भरतेचं ढोंग त्यांना अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. या ट्विटसोबतच राहुल यांनी सीएमआयईनं जारी केलेल्या अहवालाचं वृत्त देखील ट्विट केलं आहे.
ऑगस्ट महिन्यात औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही क्षेत्रांतून जवळपास १५ लाखांहून अधिक जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याआधी राहुल गांधी यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला होता. मोदी सरकारच्या 'जीडीपी'चा अर्थ गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत वाढ असा आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती. "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमकं कोणत्या GDP बाबत बोलत आहेत ते मला नंतर कळलं. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केलाय", असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.
२३ लाख कोटी गेले कुठे?"मोदी सरकारनं गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमातून तब्बल २३ लाख कोटींची कमाई केली आहे. हा पैसा नेमका गेला कुठे?", असा सवाल राहुल गांधी यांनी सरकारला केला होता. देशात डिमोनिटायझेशन आणि मॉनिटायझेशन एकाच वेळी सुरू आहे. मोदींच्या निवडक चार-पाच मित्रांचं मॉनिटायझेशन होत आहे आणि देशातील शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, एमएसएमई, नोकरदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि इमानदार उद्योगपतींचं डिमॉनिटायझेशन सुरू आहे, असाही टोला राहुल यांनी यावेळी लगावला होता.