लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी बिहार महाआघाडीने रविवारी पाटणा येथील गांधी मैदानावर 'जन विश्वास महारॅली' आयोजित केली होती. या मेगा रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (GST) सारख्या मोठ्या निर्णयांमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत. मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश आणि भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
गेल्या 40 वर्षात आज देशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी दुप्पट आहे. बांगलादेश आणि भूतानपेक्षा भारतात बेरोजगार तरुणांची संख्या जास्त असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला. देशातील बेरोजगारी वाढण्याचे मुख्य कारण सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या धोरणामुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत असं म्हटलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "जीएसटी आणि मोदी सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीमुळे देशात रोजगार निर्माण करणारे छोटे उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. आज देशात बड्या उद्योगपतींची मक्तेदारी निर्माण होत आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची सर्व संपत्ती एका उद्योगपतीच्या हाती दिली आहे."
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील मोहना येथे भारत जोडो न्याय यात्रेच्या 50 व्या दिवशी राहुल गांधी यांनी एका सभेला संबोधित केलं. बेरोजगारीच्या मुद्द्यावर त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. रविवारी सकाळी ग्वाल्हेरमध्ये माजी सैनिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांशी त्यांनी संवाद साधला.
राहुल गांधी म्हणाले की, "भारत जोडो यात्रेदरम्यान लोकांनी सांगितलं होतं की, तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत आलात पण इतर राज्यांचे - पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, गुजरात आणि पूर्वोत्तर राज्यांचे काय?' या सगळ्यानंतरच 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू झाली आहे. या दुसऱ्या प्रवासात 'न्याय' या शब्दाचा समावेश होता."