बंगळुरू: मोदी सरकारनं आधी 'बेटी बचाव, बेटी पढाव', अशी घोषणा दिली होती. मात्र आता त्या घोषणेत बदल झालाय. आता भाजपच्या आमदारांपासून बेटी बचाव, अशी सरकारची घोषणा आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर टीका केलीय. कथुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणांमुळे देश ढवळून निघाला. कथुआमधील बलात्कार प्रकरणात भाजपचे दोन आमदार आरोपींच्या बचावासाठी रस्त्यावर उतरले होते. तर उन्नावमधील प्रकरणात भाजपच्या आमदाराला अटक करण्यात आली होती. याच घटनांचा संदर्भ देत राहुल गांधी भाजपवर बरसले. त्यांनी कलगीमध्ये जनसभेला संबोधित केलं.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी प्रचारासाठी कर्नाटकमध्ये आहेत. यावेळी जनसभेला संबोधित करताना त्यांनी दलितांवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन मोदी सरकारवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. 'मोदी निवडणूक दौऱ्यांमधील भाषणांमध्ये कायम दलितांचा उल्लेख करतात. मात्र दलितांवरील हल्ल्यावर ते काहीही बोलत नाहीत. भाजपच्या नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दलितांवर हल्ले केल्यावर मोदी मूग गिळून गप्प बसतात,' अशा तिखट शब्दांमध्ये राहुल गांधी मोदींवर बरसले. राहुल गांधींनी महागाईच्या मुद्यावरुनदेखील मोदी सरकारला लक्ष्य केलं. जगभरात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होत असताना भारतात इंधनाचे दर कसे काय वाढतात, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. पंतप्रधान कसं खोटं बोलतात, हे देशातील तरुणांना माहितीय. मोदींनी देशातील शेतकऱ्यांचा, मुजरांचा पैसा नीरव मोदीला दिला, असाही आरोप राहुल यांनी केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं 90 टक्के आश्वासनं पूर्ण केल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजप आमदारांपासून बेटी बचाव; राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 3:21 PM