"भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:53 PM2023-08-09T12:53:33+5:302023-08-09T12:53:58+5:30
अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
Rahul Gandhi, Modi Govt No trust motion: काही लोक म्हणतात हा एक देश आहे, काही म्हणतात हा वेगवेगळ्या भाषांचा देश आहे. काही म्हणतात की हा धर्म आहे, हे सोने आहे, हे चांदी आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की या देशाचा आवाज एकच आहे. हा भारत देश एक आवाज आहे. भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवावाच लागेल. हा आवाज ऐकायचा असेल तर आपला अहंकार, आपली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतील. तरच तो आवाज ऐकू येईल, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाप्रणित एनडीए सरकारवर घणाघात केला. मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.
गांधी पुढे म्हणाले, "भारत हा एक संपूर्ण देश आहे. त्याचा आवाज एक आहे. या आवाजाची हाक तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर तुम्हाला तुमचा अंहकार बाजूला ठेवावा लागेल. मी रोज ८-१० किमी रनिंग (धावणे) करायचो. त्यामुळे मी सहज २०-२५ किमी चालू शकतो असे मला वाटायचे. माझ्यात तो अहंकार होता. पण जेव्हा मी तसे करायचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्यातला अहंकार क्षणात नष्ट झाला. कारण दोन-तीन दिवसांतच माझे गुडघे इतके दुखू लागले की माझा अहंकार निघून गेला. माझा अहंकार लांडग्याएवढा मोठा होता, तो अगदी मुंगीएवढा शिल्लक राहिला."
"मी भारत जोडो यात्रा केली. या यात्रेदरम्यान एका शेतकऱ्याने कापसाचा गठ्ठा दिला. तो मला म्हणाला की, राहुलजी माझ्याकडे हेच राहिले आहे. बाकी काही राहिले नाही. मी शेतकऱ्याला विचारले की, विम्याचे पैसे मिळाले का? तो म्हणाला नाही... भारतातील बड्या उद्योगपतींनी ते हिसकावून घेतले. मी एक विचित्र गोष्ट पाहिली. त्याच्या हृदयातील वेदना मला जाणवल्या. त्याची वेदना माझी वेदना बनली. त्याचाच अर्थ हा सारा प्रकार योग्य नाही," असेही राहुल गांधी म्हणाले.
"मणिपूरमध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. भाजपा सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची आणि भारतमातेची हत्या केली. तुम्ही लोक देशद्रोही आहात, तुमचे या देशावर किंवा देशातील लोकांवर प्रेम करत नाही," असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केली.