Sam Pitroda on Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या अगदी जवळ असलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. यावेली त्यांनी राहुल गांधी आणि दिवंगत राजीव गांधी यांची थेट तुलना केली. "राहुल गांधी आपल्या वडिलांपेक्षा जास्त हुशार आहे. बौद्धिक असण्यासोबतच ते एक उत्तम रणनीतीकारदेखील आहेत. राजीव जास्त मेहनती होते. दोघांचा डीएनए एकच आहे. दोन्ही नेते आयडिया ऑफ इंडियाचे पुरस्कर्ते आहेत," अशी प्रतिक्रिया पित्रोदा यांनी दिली.
राजीव आणि राहुल यांना जनतेची काळजी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा शिकागो येथे पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "मी राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव, मनमोहन सिंग, व्हीपी सिंह, चंद्रशेखर आणि एचडी देवेगौडा यांसारख्या अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. मला अनेक माजी पंतप्रधानांना जवळून पाहण्याची संधी मिळाली, पण कदाचित राहुल आणि राजीव यांच्यातील फरक हा आहे की, राहुल अधिक बुद्धिवादी, विचारवंत आहेत. राजीव जरा जास्तच मेहनती होते. त्यांचा डीएनए एकच आहे. त्यांना लोकांबद्दल समान काळजी आणि भावना आहेत. ते खरच खूप साधे लोक आहेत. त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही वैयक्तिक आकांशा नाहीत."
राहुलची प्रतिमा डागाळली "राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यांची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले. पण, राहुल यांची खरी प्रतिमा आता समोर येत आहे. त्यांच्या दोन भारत दौऱ्यांचा यात खूप फायदा झाला. याचे संपूर्ण श्रेय मी राहुलला देतो. राहुल बराच काळ लढले आणि यातून बाहेर आले. त्यांच्यात पंतप्रधान होण्याचे सर्व गुण आहेत. एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या वारशावर, पक्षावर दिवसरात्र हल्ला करणे वाईट आहे. हे लोक जाणूनबुजून खोटं बोलतात, फसवतात आणि चुकीची माहिती पसरवतात. माध्यमांवर कुणाचे तरी नियंत्रण असल्याचे जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे," असेही पित्रोदा यावेळी म्हणाले.
राहुल सरकारवर टीका करतात, भारतावर नाहीपित्रोदा पुढे म्हणतात, "परदेश दौऱ्यांदरम्यान केंद्रावर टीका करणाऱ्या राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपची टीका निराधार आहे. सरकारवर टीका करणे म्हणजे भारतावर टीका करणे नव्हे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका करायला हरकत नाही. काँग्रेसच्या संस्थापकांनी ज्या भारताची कल्पना केली होती, त्या भारतावर पक्षाच्या प्रत्येक नेत्याचा विश्वास आहे." दरम्यान, राहुल गांधी 8-10 सप्टेंबरला अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा असून, यात ते विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधतील, अशी माहितीही पित्रोदा यांनी यावेळी दिली.