Rahul Gandhi Speech Highlights : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणामुळे भारतात खळबळ उडाली आहे. त्यांनी माफी मागावी या मागणीवर भाजप नेते ठाम आहेत. दरम्यान, राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावरुन भारतात परतले आणि गुरुवारी संसदेत पोहोचले. यानंतर दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल म्हणाले की, अदानी प्रकरणाला सरकार घाबरले आहे. मी आज संसदेत गेलो आणि सभापतींना भेटलो. मी सभापतींना सांगितले की, मला संसदेत बोलायचे आहे, मला माझे म्हणणे मांडायचे आहे. सरकारच्या चार मंत्र्यांनी सभागृहात माझ्यावर आरोप केले आहेत, त्यामुळे मला माझे म्हणणे मांडू द्यावे. मात्र, मला संसदेत बोलू दिले जाईल, असे वाटत नाही. मी आल्यानंतर 1 मिनिटाने सभागृह तहकूब करण्यात आले.'
ते पुढे म्हणाले, मी संसदेत अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे भाषण केले होते, ते कामकाजातून काढून टाकण्यात आले. त्या भाषणात काढून टाकण्यासारखे काहीही नव्हते. या सर्व गोष्टी मी सार्वजनिक नोंदी, लोकांची विधाने आणि वृत्तपत्रांमधून काढल्या होत्या. हे संपूर्ण प्रकरण लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रकार असल्याचे राहुल म्हणाले.
राहुल गांधींनी पुन्हा सरकारला प्रश्न विचारले? - अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय संबंध?- संरक्षणाची कंत्राटे गौतम अदानींनाच का दिली जात आहेत?- श्रीलंका आणि बांगलादेशात काय घडले, ते का घडले, कोणी केले?- पंतप्रधान नरेंद्र मोदी, अदानी आणि स्टेट बँकेचे अध्यक्ष यांच्यात ऑस्ट्रेलियात बैठक का झाली, त्यात काय चर्चा झाली?