Rajya Sabha Session: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केंब्रिजमधील भाषणावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. एकीकडे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांना सभागृहात येऊन माफी मागण्याची मागणी केली, तर दुसरीकडे काँग्रेसच्या खासदारांनीही भाजप खासदारांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवत आहेत आणि भाजप लोकशाही आणि देशाचा स्वाभिमान वाचवण्याच्या गप्पा मारत आहेत' अशी टीका केली.
भाजपने राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. याबाबत संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 'लोकशाहीला चिरडणारे आणि नष्ट करणारेच लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारत आहेत. राहुल गांधींचे महाविद्यालयामधील लोकशाहीबद्दलचे भाषण आपल्या पद्धतीने मांडण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. खुद्द मोदी सरकारच इथल्या लोकशाहीला चिरडत आहे,' अशी टीका खर्गे यांनी केली.
'पियुष गोयल यांनी नियम मोडले'काँग्रेस अध्यक्षांनी यावेळी पियुष गोयल यांच्यावरही टीका केली. 'राहुल गांधींचे लंडनमधील विधान संसदेत मांडणे नियमानुसार चुकीचे आहे. राज्यसभेत एका नेत्याबद्दल बोलणे योग्य नाही. गोयल यांनी नियम मोडला आहे. जे सभापती नियमांबाबत बोलतात, त्यांनी हे कसे होऊ दिले. गोयल यांनी 'शेम ऑन यू' असे अश्लील शब्द वापरले. नोटीस दिल्यानंतर लोकसभेत असे बोलता येते. त्यांनी राज्यसभेत हे बोलायला नको होते,' असेही खर्गे म्हणाले.
खर्गेंनी भाजपला दाखवला आरसाकाँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, “मी तुम्हाला चीनमध्ये केलेल्या वक्तव्याची आठवण करून देऊ इच्छितो. तुम्ही 'भारतीय असल्याची लाज वाटायची', असे वक्तव्य केले होते. आता तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो. हा भारताचा आणि भारतीयांचा अपमान नव्हता का? तुमच्या मंत्र्यांना त्यांच्या आठवणी ताज्या करायला सांगा! काँग्रेस पक्षावर टीका करण्यापूर्वी 'सत्याचा आरसा' बघा,'' असे खर्गे म्हणाले.