नवी दिल्ली - आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास दिल्ली पोलिसांचे पथक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या घरी अचानकपणे धडकले. खरे तर, दिल्ली पोलिसांनीराहुल गांधी यांना त्यांच्या श्रीनगरमधील एका वक्तव्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. या संदर्भातच आज स्पेशल सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) सागरप्रीत हुडा आपल्या चमूसह राहुल यांच्या घरी पोहोचले होते. यासंदर्भात स्वतः विशेष सीपींनीच राहुल यांच्या घराबाहेर असलेल्या माध्यमांना संपूर्ण प्रकार सांगितला.
'आम्हाला संपूर्ण माहिती मिळवी, अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. पीडितांना न्याय मिळावा. याच संदर्भात आज मी स्वतः माननीय खासदारांकडे माहिती घेण्यासाठी आलो आहे,' असे सागरप्रीत हुडा यांनी म्हटले आहे. यावेळी, राहुल गांधी यांच्या सोबत काही संपर्क झाला का? असे पत्रकारांनी विचारले असता, त्यांच्या स्टाफपर्यंत मेसेज पोहोचवण्यात आला आहे, असे स्पेशल सीपी सागरप्रीत यांनी सांगितले.
यावेळी संबंधित वक्तव्य हे श्रीनगरमधील आहे. त्या वक्तव्याशी दिल्ली पोलिसांचा काय संबंध? अशा आशयाचा प्रश्न विचारला असता, "ही यात्रा दिल्लीतून गेली होती. यात्रेदरम्यान मी स्वतः तेथे होतो. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही होता, कारण राहुल गांधीही येथेच राहतात आणि यात्राही येथूनच गेली. यामुळे, कुणीही पीडित असेल, तर त्यासंदर्भात आम्हाला माहिती मिळावी, अशी आमची इच्छा आहे. जर संबधित दिल्लीतील असतील तर आम्ही ताबडतोब कायदेशीर प्रक्रिया सुरू करू आणि पीडित दुसऱ्या कुण्या राज्यातील असेल तर त्यासंदर्भातही...
यात्रेदरम्यान आम्हाला कुठलीही महिला रडताना दिसली नाही -स्पेशल सीपी सागरप्रीत म्हणाले, दिलेले वक्तव्य (राहुल गांधींनी) सोशल मीडियावर जबरदस्त पसरले. यानंतर आम्ही दिल्लीतील यात्रेदरम्यानचे व्हिडीओही पाहिले. यात कुणी महिला राहुल गांधींना भेटल्या का याचाही शोध घेतला. पण आमच्या तपासात असे काहीही आढळले नाही. यानंतर आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्याचा विचार केला. मात्र ते परदेशात गेले होता. आता ते येताच आम्ही त्यांना विनंती केली आहे की, संबंधित घटेची आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून संबंधितांचे नुकसान होणार नाही. यात काही अल्पवयीनही असू शकतात. यात पॉक्सो अॅक्टही लागू शकतो. ही संपूर्ण माहिती घेण्यासाठी आम्ही राहुल गांधींच्या घरी पोहोचलो आहोत.
काय म्हणाले होते राहुल गांधी -पोलिसांनी म्हटल्या प्रमाणे राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान श्रीनगरमध्ये म्हटले होते की, महिलांचा अजूनही लैंगिक छळ होत असल्याचे मी ऐकले आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना त्यांच्या या वक्तव्यावर नोटीस बजावली होती. तसेच, लैंगिक छळाची माहिती देणाऱ्या महिलांची माहिती मागितली होती.