नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीकेरळमधीलवायनाड मतदार संघातून रिंगणात उतरणार आहेत. यावरुन केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीएमचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
व्ही. एस. अच्युतानंदन यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख अमूल बेबी असा केला आहे. यासंदर्भात व्ही.एस. अच्युतानंदन यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. एप्रिल 2011 मध्येही व्ही. एस. अच्युतानंदन यांनी असेच विधान केले होते. व्ही.एस. अच्युतानंदन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.
व्ही. एस. अच्युतानंदन यांनी फेसबुक पोस्ट लिहून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी राजकारणात बालिशपणा दाखविला आहे, त्यामुळे त्यांना तेव्हा 'अमूल बेबी' म्हणालो होतो. त्यांनी वायनाड मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता ते सिद्ध झाल्याचे समजते, असे व्ही. एस. अच्युतानंदन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढवणार आहेत. ते पारंपरिक अमेठी मतदारसंघासोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मात्र, काँगेसच्या हा निर्णय केरळमध्ये वर्चस्व असलेल्या डाव्या पक्षांना फारसा रुचलेला नाही.
काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएम केली आहे. तसेच, सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा उल्लेख 'पप्पू' असा केला आहे. देशाभिमानी या सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे 'पप्पू स्ट्राइक' असल्याचे म्हटले आहे.