नवी दिल्ली : काँग्रेस स्थापना दिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अचानक परदेशी रवाना झाल्याने काँग्रेसचे पंजाबमधील नेते अस्वस्थ झाले होते. राहुल गांधी यांची ३ जानेवारी रोजी पंजाबच्या मोगा शहरात सभा व्हायची होती. ती आता रद्द करावी लागणार आहे. ती सभा कधी होणार, याची नेत्यांना काहीच कल्पना नाही.
ते इटलीला खासगी कामासाठी गेले आहेत आणि ५ जानेवारी रोजी ते भारतात परततील, ते इटलीत असले तरी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांच्या ते संपर्कात आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याच्या निष्कारण अफवा पसरवल्या जात आहेत, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीही राहुल गांधी परदेशात गेले होते आणि ते संपताच पुन्हा गेले आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आणि पंजाबमधील सभा निश्चित झाली असताना त्यांनी जायचे टाळायला हवे होते, असे काही नेत्यांनी खासगीत बोलून दाखविले. पंतप्रधानांपासून भाजपचे अनेक बडे नेते आतापासूनच प्रचारात गुंतले असताना राहुल गांधी यांनी परदेशात जायचे कारण नव्हते, असे काही काँग्रेस नेते म्हणाले.
सर्वत्र प्रचार करणार मात्र पाच राज्यांच्या निवडणुका जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी राहुल गांधी भारतात आलेले असतील आणि ते पाचही राज्यांत प्रचाराला जातील, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.