नवी दिल्ली-
शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं अटक केली आहे. राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांच्या अटकेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांकडून दिवसभर जोरदार निदर्शनं करण्यात आली. ठिकठिकाणी शिवसेनेकडून आंदोलनं देखील झाली आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीचसंजय राऊत यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईला उद्देशून भाजपावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्याच्या बातमीचा स्क्रिनशॉट ट्विट करत मोदी सरकारला सूचक इशारा दिला आहे. 'राजा'चा संदेश स्पष्ट आहे की त्याच्याविरोधात जो बोलेल त्याला अडचणींचा सामना करावा लागेल, अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसंच हुकूमशहानं एक गोष्ट लक्षात ठेवावी की अखेरीस सत्याचाच विजय होतो आणि अहंकाराचा पराभव, असंही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"राजा का संदेश साफ़ है - जो मेरे खिलाफ़ बोलेगा, वो तकलीफें झेलेगा। सरकारी एजेंसियों का दुरुपयोग करके विरोधियों का हौसला तोड़ने और सच का मुंह बंद करने की पुरज़ोर कोशिश जारी है। लेकिन तानाशाह सुन ले, अंत में 'सत्य' जीतेगा, और अहंकार हारेगा।", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीमुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. एक हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांनी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे.काल दिवसभर राऊत यांची चौकशी केल्यानंतर ईडीने रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर आज दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी राऊत यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले गेले. कोर्टाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.