सूरत : गुजरातमधील सुरतच्या सत्र न्यायालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. शु्क्रवारी न्यायालयानेराहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. 2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.
या विरोधात राहुल गांधी यांनी दाखल याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता काँग्रेस उच्च न्यायालयात जाणार आहे. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. चार वर्षांनंतर 23 मार्च रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.