Rahul Gandhi : लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात राखीव सीट सोडून राहुल गांधी मागच्या रांगेत जाऊन का बसले? संरक्षण मंत्रालयानं सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 15:09 IST2024-08-15T15:02:28+5:302024-08-15T15:09:14+5:30
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी असं का केलं? यावर संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण आलं आहे.

Rahul Gandhi : लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात राखीव सीट सोडून राहुल गांधी मागच्या रांगेत जाऊन का बसले? संरक्षण मंत्रालयानं सांगितलं...
नवी दिल्ली : भारताचा आज ७८ वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र, यावेळी राहुल गांधी राखीव आसन (रिझर्व्ह सीट) सोडून सर्वसामान्य लोकांमध्ये बसल्याचे दिसून आले. दरम्यान, राहुल गांधी यांनी असं का केलं? यावर संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण आलं आहे.
संरक्षण मंत्रालयानुसार, राहुल गांधी यांच्यासाठी पुढील सीट राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, त्यांनी आपल्या इच्छेनुसार पाठच्या रांगेत बसण्याचा निर्णय घेतला. संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, "स्वातंत्र्य दिनानिमित्त विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांच्यासाठी पुढची जागा राखीव ठेवण्यात आली होती, परंतु त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार मागील रांगेत बसण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांनी तेथील व्यवस्था करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की, मला सर्वसामान्यांमध्ये बसायचं आहे. मी इथं उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांसोबत सभागृहात बसतो."
राहुल गांधी ज्या मागील रांगेत बसले होते, त्या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू बसले होते. राहुल गांधी यांच्या पुढच्या रांगेत भारतीय हॉकी टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेश, कॅप्टन हरमनप्रीत सिंह बसलेले. तसंच, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकरही त्याठिकाणी बसलेली होती. दरम्यान, लाल किल्ल्यावरील सोहळ्यात राहुल गांधींच्या सहभागानं विरोधकांचा १० वर्षांचा दुष्काळही संपुष्टात आला. २०१४ नंतर पहिल्यांदाच राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहिले.