Rahul Gandhi, Hanuman Mandir: राहुल गांधी 'मरघट वाले हनुमानजीं'च्या मंदिरात, रामायण काळाशी आहे खास 'कनेक्शन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:44 PM2023-01-03T20:44:28+5:302023-01-03T20:45:06+5:30
या मंदिरात राहुल गांधींनी हनुमान चालिसा पठणही केले
Rahul Gandhi, Hanuman Mandir: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) दिल्लीच्या काश्मीर गेट येथे असलेल्या मरघटच्या हनुमान मंदिरात पोहोचले. दर्शन, पूजा व हनुमान चालिसाचे पठण करून येथून प्रवासाला सुरुवात करण्यात आली. मरघट हनुमानजी मंदिराशी गांधी परिवाराचा जुना संबंध असून या मंदिरावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. १९७३ मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा मरघटच्या हनुमानजींच्या मंदिरात पोहोचल्या होत्या. पुढेही राहुल यांचे वडील राजीव गांधी आणि त्यांचे काका संजय गांधीही येथे येत असत. जाणून घेऊया या मंदिराबाबत काही रोमांचक गोष्टी-
मंदिराला नाव कसे पडले?
मरघटचे हनुमान मंदिर (मरघट वाले बाबा मंदिर) काश्मिरी गेटच्या जमुना बाजार परिसरात आहे. अनेक लोक या मंदिराला 'मरघट वाले बाबा' या नावानेही ओळखतात. एकेकाळी या मंदिराच्या उजव्या तीरावरून यमुना नदी वाहत होती, पण हळूहळू यमुनेचे पाणी कमी होत गेले आणि नदी मंदिरापासून दूर गेली. आजही यमुनेला पूर आला तर अनेक वेळा यमुनेचे पाणी मंदिराच्या दरवाज्यापर्यंत येते. मरघट हनुमानजींच्या मंदिरातील बजरंगबलीची मूर्ती जमिनीपासून सुमारे 8 फूट खाली आहे. मरघट हनुमानजींच्या मंदिरासमोर स्मशानभूमी आहे. तिथे आजही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. हे स्मशान रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते. स्मशानभूमीमुळेच या मंदिराला 'मरघट वाले हनुमानजी का मंदिर' असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
मंदिराविषयी काय श्रद्धा?
मरघट हनुमानजींच्या मंदिराबाबत अनेक प्राचीन आणि पौराणिक समजुती आहेत. मंदिराच्या पुजाऱ्यांचा दावा आहे की हनुमानजी स्वतः येथे प्रकट झाले होते. सर्वात पौराणिक आणि प्राचीन दावा रामायण आणि महाभारत काळाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. मरघट वाले हनुमानजी मंदिर हे महाभारत काळात पांडवांनी बांधलेल्या पाच मंदिरांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.
रामायण काळाशीही संबंध असल्याचा दावा
आणखी एक पौराणिक मान्यता अशी आहे की राम-रावण युद्धादरम्यान बंधू लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर पवनपुत्र हनुमान संजीवनी वनस्पती घेण्यासाठी या मार्गानेच गेले. त्यांनी इथेच थांबून विश्रांती घेतली आणि हळूहळू या मंदिराची किर्ती वाढत गेली. दर मंगळवार व शनिवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील व्यक्तीही येथे येतात.