भरुच - गुजरातमध्ये राजकीय वातारवण तापण्यास सुरुवात झाली आहे. गुजरात निवडणुकीत भाजपला करंट लागणार आहे असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. भरुच येथे झालेल्या सभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टिकास्त्र सोडलं. वर्ल्ड बँकेच्या क्रमवारीत भारताची स्थिती सुधारण्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना टोला लगावत म्हटलं की, मोदींच्या एका सेल्फीमुळे चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते. राहुल गांधी यांनी 'मेक इन इंडिया'वरही टीका केली असून, भारतीय तरुणांना रोजगार मिळत नसल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी बोलले आहेत की, 'चीनसोबत स्पर्धा सुरु असतानाही देशात मेड इन चायना सुरु आहे. आपल्या मोबाइवरुन मोदी जेव्हा सेल्फी घेण्यासाठी बटण दाबतात, तेव्हा चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते. चीनमध्ये दररोज 50 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियामध्ये दिवसाला फक्त 450 तरुणांना रोजगार मिळतो. संपुर्ण वर्षभरात भाजपा सरकार फक्त एक लाख तरुणांना रोजगार देऊ शकलं आहे. हेच सत्य आहे, आणि हेच भाजपाचं विकास मॉडेल आहे'.
यावेळी राहुल गांधींनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्यावरुनही पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था नष्ट केली, जीडीपी 2 टक्क्यांनी खाली आणला. 8 नोव्हेंबरला मोदींनी सर्वात मोठी चूक केली, पण ते मान्य करण्यास तयार नाहीत अशी टीका राहुल गांधींनी केली. जीएसटी आणि नोटाबंदीने छोटे व्यवसाय नष्ट केले असं राहुल गांधी बोलले आहेत. भरुचमध्ये आपल्या तीन दिवसांच्या दौ-याला सुरुवात करत असताना राहुल गांधींनी मोदी सरकावर निशाणा साधत उद्योगपतींना फायदा पोहोचवला जात असल्याचा आरोप केला.
'समाजातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. आता फक्त उद्योगपतीच आहेत ज्यांना कोणताच त्रास नाही. त्यांना सरकारचं पुर्ण समर्थन मिळालं आहे. ते काहीच बोलत नाहीत, त्यांना कोणतीच समस्या नाही, ते कोणतंही आंदोलन करत नाहीत. इथे जनता नोटाबंदी आणि जीएसटीमुळे त्रस्त आहे', असं राहुल गांधी बोलले आहेत.
यावेळ राहुल गांधींना काळा पैसा भारतात आणण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन दिली. 'भाजपाला सरकार तीन वर्षांपासून सत्तेत आहे. पण स्विस बँकेत खातं असणारे कितीजण जेलमध्ये आहेत ? एक नाव सांगा ज्याला मोदींनी जेलमध्ये टाकलं आहे. विजय मल्ल्या देशाबाहेर बसून मजा करत आहे', असा टोला राहुल गांधींनी लगावला. काळ्या पैशाविरोधात कारवाई केली, मग तो पैसा सर्वसामान्य जनतेला का मिळाला नाही? तो पैसा गेला कुठे? असे प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केले.