नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना व्हायरस, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. याच दरम्यान आता राहुल गांधी आपल्या एका ट्विटमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. जगभरातील काही हुकुमशहांची नावं त्यांनी ट्विटद्वारे जाहीर केली आहेत. तसेच या सर्व हुकुमशहांची नावं ‘M’ या अद्याक्षरानेच का सुरू होतात असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "Marcos (मार्कोस), Mussolini (मुसोलिनी), Milošević (मिलोसेविक), Mubarak (मुबारक), Mobutu (मोबुतू), Musharraf (मुशर्रफ), Micombero (मायकोंबेरो) या सर्व हुकुमशहांची नावं ‘M’ नेच का सुरू होतात?" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. "मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत" असा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता.
"मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत", राहुल गांधींचा घणाघात
"पंतप्रधान नरेंद मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत. तामिळनाडुतील लोकं, भाषा व संस्कृतीने त्यांच्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या अधीन असायला हवं असं त्यांचं मत आहे. तसेच न्यू इंडियाची त्यांची धारणा आहे की, तामिळनाडूतील लोकांनी देशात दुसऱ्या दर्जाचे नागरीक असायला हवं. या देशात अनेक भाषा आहेत. आम्हाला असं वाटतं की सर्व भाषा, तामिळ, हिंदी, बंगाली, इंग्रजी इत्यादींचे या देशात स्थान आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
"RSS महिलांचा सन्मान करत नाही; ही फॅसिस्ट, पुरुषवादी संघटना", राहुल गांधींचा हल्लाबोल
राहुल गांधी यांनी आरएसएसवर देखील टीकास्त्र सो़डलं होतं. आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना असल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं. "महिलांना समान स्थान दिल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. आरएसएसमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत. आदर केला असता तर त्यांनी महिलांचा संघटनेत समावेश केला असता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.