- शरद गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात सत्तापरिवर्तन जवळपास पूर्ण झाले आहे. सोनिया गांधी या भलेही पक्षाच्या अध्यक्ष आहेत तरी सगळे निर्णय राहुल गांधी हेच घेत आहेत. त्यांनी औपचारिकरीत्या पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारायचेच शिल्लक राहिले आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांत आपली कार्यशैली आणि सहकाऱ्यांमध्ये अनेक बदल केले आहेत. आता ते कार्यकर्ते आणि नेत्यांंना सहज उपलब्ध होत आहेत. संघटनमंत्री के. सी. वेणुगोपाल यांच्याऐवजी आता त्यांचे मुख्य रणनीतिकार निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक आहेत. त्यांच्याशी सर्व महत्त्वाच्या विषयांवर गांधी विचारविमर्श करतात.
अलंकार सवाई, कौशल विद्यार्थी आणि के. राजू यांच्यासारख्या आपल्या जवळच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संवाद साधण्याऐवजी राहुल गांधी आता पक्षाच्या नेत्यांशी थेट बोलत आहेत आणि पक्षाशी संबंधित सगळे निर्णय स्वत: घेत आहेत.
बंडखोरीची लक्षणे नाहीशी केलीगेल्या दिवसांत उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हरीश रावत यांच्यात दिसणारी बंडखोरीची लक्षणे राहुल गांधी यांनी त्यांच्याशी थेट बोलून नाहीशी केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी संबंधित सगळे निर्णयही प्रियांका गांधी या राहुल गांधी यांच्याशी बोलूनच घेत आहेत.
- राहुल गांधी यांच्या स्पष्ट निर्देशांनंतर पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्याचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्याविरोधातील कारवाया बंद केल्या.