लोकमत न्यूज नेटवर्क
पालनपूर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कंपनीला शेअर बाजारातील त्रुटीवरुन सेबीने दंड आकारल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान मोदी आणि रुपाणी यांच्यावर जोरदार टीका केली. तर, मोदी यांनी या प्रकरणी खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली. बनासकांठा जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी असा दावा केला की, सेबीने रुपाणी यांना ‘बेईमान’म्हटले आहे आणि त्यांना दंड आकारला आहे. ते म्हणाले की, गुजरात पूर्ण देशात सर्वाधिक भ्रष्ट आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी म्हणत होते की, ‘न खाऊंगा, ना खाने दूंगा’. आता त्यांचा नारा आहे की, ‘न बोलता हूं, ना बोलने दूंगा.’ तुम्ही अमित शहांच्या मुलाबाबत आणि रुपाणी यांच्याबाबत काहीच बोलले नाही तर, गुजरातची जनता समजेल की, आपण चौकीदार नव्हे तर, ‘भागीदार’ आहात. पातळी सोडणार नाही भाजपने प्रचारात पातळी सोडली तरी, काँग्रेस पातळी सोडणार नाही, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, आम्ही मोदी यांच्यावर टीका जरुर करु पण, पंतप्रधान पदाचा उपर्मद करणार नाही.