काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा शनिवारी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथून सुरू झाला. या यात्रेत आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. मुरादाबादमध्ये लोकांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांचं जंगी स्वागत केलं आहे. यात्रेदरम्यान जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली.
यात्रेदरम्यान लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "बंधू आणि भगिनींनो, इकडे बघा, तिकडे बघा, पंतप्रधान मोदी हेच करतात. लोकांची दिशाभूल करतात. ही भाजपाची सिस्टम आहे, एक माणूस बॉलिवूड ते सर्जिकल स्ट्राईकपर्यंत बोलून तुमचे लक्ष दुसरीकडे नेईल. या देशात 50% मागासलेले लोक, 15% अल्पसंख्याक, 15% दलित आणि 8% आदिवासी आहेत. या 90% लोकांचा या देशात किती सहभाग आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे. ते तुम्हाला मनरेगाच्या यादीत दिसतील, पण मोठमोठ्या कंपन्या, उच्च न्यायालये, मीडियामध्ये दिसत नाहीत."
राहुल यांनी मोदींवर निशाणा साधत पुढे म्हटलं की, "पंतप्रधान मोदी म्हणतात, 'हिंदुस्थान सर्वांचा', जेव्हा 90% लोकांचा सहभाग नाही, तर हा सर्वांचा हिंदुस्थान कसा? मी तुझ्यासोबत 4000 किलोमीटर चाललो. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायचे असेल तर पहिलं काम द्वेष नष्ट करणं ही या यात्रेची घोषणा आहे. देशभक्ती देशाला जोडते, तोडत नाही. हा माझा तुमच्यासाठी मेसेज आहे. इथे आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो."
भारत जोडो न्याय यात्रेत पहिल्यांदाच दिसल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या...
भारत जोडो यात्रेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, मुरादाबादमध्ये आल्याचा आनंद आहे. प्रियंका यांनी लोकांना प्रश्न विचारत म्हटलं की, दोन वर्षांत इथे काय बदललं?. समस्या सुटल्या की नाही? आज पेपर लीक झाले आहेत, तरुण बेरोजगार आहेत.यासोबतच प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, सरकार सातत्याने अत्याचार करत असून बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र त्यांचं कोणीही ऐकत नाही. गोरगरिबांच्या घरावर बुलडोझर चालला असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यूपीमधील मुरादाबाद येथून या यात्रेत सामील झाल्या आहेत.