बंगळुरु, दि. 16 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर धोरणावर हल्ला करत सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच पाकिस्तानला कुरापती करण्याची संधी मिळाल्याची टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सांगितलं की, 'मोदी सरकारमुळे पाकिस्तानला आधीच समस्यांना तोंड देत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या भाषणामध्ये केलेल्या काश्मीरच्या उल्लेखावर बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते.
राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत सांगितलं की, 'त्यांनी जम्मू काश्मीरध्ये हिंसा आणि द्वेष पसरवला आहे. यामुळे पाकिस्तानचा फायदा झाला आहे'. राहुल गांधी यांनी यावेळी दावा केला आहे की, त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत मिळून कोणताही तमाशा किंवा ड्रामा न करता काश्मीरच्या मुद्द्यावर काम केलं होतं. 'पी चिदंबरम आणि जयराम रमेश सारख्या नेत्यांनी काश्मीरसाठी 10 वर्ष काम केलं, पण मोदी सरकारने त्यांचे हे सर्व प्रयत्न वाया घालवले आहेत', अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.
राहुल गांधी यांनी सांगितलं की, '2004 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने काश्मीर मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काश्मीर मुद्दा जळत होता. 10 वर्ष जम्मू काश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळालं हे मनमोहन सरकारचं यश होतं'.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना काश्मीर समस्येचाही मुद्दा उपस्थित केला होता. 'दहशतवाद्यांविरोधात कोणतीही नरमाईची भूमिका स्वीकारणार नाही. काश्मीरमध्ये जे काही होत आहे त्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', अशी भूमिका मोदींनी काश्मीरबाबत मांडली.
गोळीबार हा काश्मीर समस्येवर उपाय नाही, असे यावेळी मोदींनी सांगितले होते. जम्मू काश्मीरचा विकास, सामान्य नागरिकांची स्वप्नं पूर्ण करण्याचा संकल्प आहे. शिवाय, दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.