नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांवरुन दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला असून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून ट्विटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधानांना लक्ष्य करत आहेत. आज पुन्हा एकदा राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. "जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्या'', असं राहुल यांनी म्हटलं आहे.
दिल्लीच्या वेशीवर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं 'दिल्ली चलो' आंदोलन अजूनही सुरुच आहे. आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्यावतीने आज दुपारी तीन वाजता चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे. याआधी केंद्राने दिलेला शर्तीसह चर्चेचा प्रस्ताव शेतकऱ्यांना फेटाळून लावला होता. त्यानंतर आज कोणत्याही अटीविना चर्चेस तयार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
"अन्नदाते रस्त्यांवर धरणे आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे टीव्हीवर 'खोटी' भाषणं सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचं आपल्या सर्वांवर कर्ज आहे. हे कर्ज त्यांना न्याय व हक्क दिल्यानंतरच फिटेल. त्यांना झिडकारुन, काठ्यांनी मारहाण करुन आणि त्यांच्यावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून नाही. त्यामुळे जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरुन उतरुन विचार करा आणि शेतकऱ्यांचा अधिकार द्या'', असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.