नवी दिल्ली, दि. 17 - भाजपा 2014 मध्ये सत्तेत येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याचा स्विकारच केला नव्हता. देशाची सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. 'जोपर्यंत सत्ता आली नाही तोपर्यंत त्यांनी कधीच तिरंग्याला सलाम केला नाही', असं राहुल गांधी बोलले आहेत. जेडीयू नेते शरद यादव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
आणखी वाचापंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपामोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी
राहुल गांधी बोलले आहेत की, 'देशाकडे पाहण्याचे दोन प्रकार असतात. एक प्रकार सांगतो देश माझा आहे, तर दुसरा म्हणतो मी देशाचा आहे. आरएसएस आणि आमच्यात हाच फरक आहे. आरएसएस म्हणतं देश आमचा आहे, पण तुम्ही या देशाचे नाहीत. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करण्यात आली, आणि तुम्ही या देशाचे नाहीत असं सांगण्यात आलं'.
'आपल्या विचारधारेच्या आधारावर निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही हे आरएसएसला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांना भर्ती केलं जात आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 'संविधान सांगतं एक व्यक्ती, एक मत. पण आरएसएस संविधान बदलू पाहत आहे', असंही राहुल गांधी बोलले आहेत.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही टीका केली. 'अरुण जेटली लोकसभेत सांगतात की, कर्ज माफ करणं आमची पॉलिसी नाही. शेतक-याचा मृत्यू झाला तरी यांना काही फरक पडत नाही', असं राहुल गांधी बोलले आहेत. नरेंद्र मोदींचं मेक इन इंडिया फेल झाल्याचा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 'मोदींनी मेक इन इंडिया दिलं, पण अनेक गोष्टी मेड इन चायना आहेत. मोदींचं मेक इन इंडिया फेल झालं हे सत्य आहे', असं राहुल गांधींनी सांगितलं.
'नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे काही ना काहीतरी खोटं बोलत असतात. जर आपण एकत्र येऊन लढलो तर हे दिसणारी नाहीत', असं राहुल गांधी बोलले आहेत.