नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा काळा पैशाच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली आहे. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये झालेल्या आर्थिक परिषदेचा कार्यक्रम संपवून मोदी बुधवारी भारतात परतले. यावरूनच राहुल गांधींनी मोदींना सुनावलं आहे. प्रिय पंतप्रधान, तुमचं भारतात स्वागत आहे. तुम्ही काळ्या पैशासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची यावेळी मला आठवण करून द्यावीशी वाटते. तुम्ही विमानातून स्वित्झर्लंडमधील काळा पैसा परत आणला असेल तर भारतातील तरुणांना आश्चर्य वाटेल, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना उपरोधिक टोला लगावला.
यापूर्वीही राहुल यांनी ऑक्सफॅम संस्थेच्या अहवालाचा दाखला देत मोदींवर टीका केली होती. ऑक्सफॅम अहवालात एक टक्का भारतीयांकडे ७३ टक्के संपत्तीचं केंद्रीकरण झाल्याची माहिती देण्यात आली होती. या अहवालाच्या बातमीसह राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरून उपरोधिक सल्ला दिला. ‘प्रिय पंतप्रधान, स्वित्झर्लंडमध्ये तुमचे स्वागत! भारतातील संपत्तीच्या केंद्रीकरणाची माहिती दावोसमध्ये देणार का? मी सोबत अहवाल पाठवत आहे.’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘पद्मावत’ सिनेमावरून सुरू असलेल्या वादासाठी पंतप्रधान मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. ‘पद्मावत’ सिनेमाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी गुडगावमध्ये लहान मुलं असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला होता. यावरून राहुल गांधी यांनी सडकून टीका केली. लहान मुलांवरील या हल्ल्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. हिंसा आणि द्वेष ही दुर्बलांची शस्त्रं आहेत. भाजपाही याच शस्त्रांचा वापर करून संपूर्ण देशात संपूर्ण देशात अराजक पसरवत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं.