Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका पाठोपाठ एक झटके मिळत आहेत. आधी त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली, नंतर त्यांची खासदारकी रद्द झाली आणि त्यानंतर तात्काळ त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीसही मिळाली. या विरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, बंगला रिकामा करण्याच्या नोटीशीला राहुल गांधी यांनी भावनिक उत्तर दिले आहे.
'मोदी आडनाव' विरोधात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. सोमवारी म्हणजेच 27 मार्च रोजी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना सदस्यत्व काढून घेतल्यानंतर तुघलक लेनचा 12 क्रमांकाचा बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली होती. या नोटिशीला भावनिक उत्तर देताना राहुल म्हणाले की, 'बंगल्यात घालवलेल्या आठवणींसाठी तुमचा आभारी आहे. पत्रात दिलेल्या सूचनांचे आपण नक्कीच पालन करू,' असे राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभा सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
एकीकडे या नोटिशीला राहुल गांधींनी उत्तर दिले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने ट्विट करून लोकशाही केवळ आठवणीत उरली असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने सोबत एक फोटोही शेअर केला आहे. जो आवाज दाबण्याचा इशारा दाखवतो. सत्ताधारी पक्ष राहुल गांधींना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.